Avinash Jadhav On Nishikant Dubey: पटक पटक के मारण्याचं वक्तव्य करून मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांना मराठी हिसका दाखवण्यात आला आहे. संसद भवनात काँग्रेसच्या मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. काँग्रेस खादसारांच्या रूद्रावतारापुढे घाबरून निशिकांत दुबेंनी अखेर पळ काढला.
लोकसभेचं हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सध्या सुरु आहे. यातच काल लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव हे निशिकांत दुबे यांना शोधत होत्या. त्यानंतर निशिकांत दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेरलं. यावेळी मराठी भाषिकांविरोधातली तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही कुणाला आणि कसे आपटून आपटून मारणार?, तुमचे वागणे योग्य नाहीय, असं काँग्रेसच्या महिला खासदारांनी सुनावलं. यानंतर वर्षा गायकवाड यांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. त्यावर आप तो मेरी बहन है, असं म्हणत निशिकांत दुबे हात जोडून तिकडून निघून गेले.
मनसेकडून कौतुक; महिला खासदारांचा सत्कारही करणार-
काँग्रेसच्या महिला खासदारांच्या या भूमिकेचं मनसेचे नेते अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी कौतुक केलं आहे. मराठीच्या आवाज बुलंद केल्यामुळे मी तिन्ही भगिनींचे आभार मानतो. यासाठी धाडस लागतं आणि हे तिन्ही महिलांनी दाखवलं, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. सदर महिला जेव्हा अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघात येतील, तेव्हा मनसेकडून या महिला खासदारांचा सत्कार करण्यात येईल, असंही अविनाश जाधव यांनी सांगितले.
आम्हीही या महिला खासदारांसाठी उभे राहू- अविनाश जाधव
आम्हाला पुरुष खासदारांकडून अपेक्षा होती ते काहीतरी करतील. मात्र त्यांनी काहीच केलं नाही. वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव या खासदार मराठीसाठी पुढे उभ्या राहिल्या. आज या महिला खासदार मराठीसाठी उभ्या राहिल्या वेळ आली तर आम्ही देखील त्यांच्यासाठी नक्की उभे राहू, असं अविनाश जाधव म्हणाले. भाजपच्या खासदारांकडून अपेक्षा नाही. शिवसेना शिंदे गटाचे खासदार काय करतात बघूया, अजून लोकसभेचं अधिवेशन सुरु आहे. मराठीची बाजू संसदेत मांडतात की नाही, हिंदीसक्तीबाबत काय बोलतात, बघूया, असंही अविनाश जाधव यांनी सांगितले.
Bank Crop Loan ; शेतकऱ्यांना या बँंकाकडून पिककर्ज मिळनार, मोठी खुशखबर
निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर केला होता हल्लाबोल-
हिंदीच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमधील एका परप्रांतीय दुकानदाराने मराठी बोलणार नाही, असं म्हटल्याने हात उचलला. यावरुन निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला होता. मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असं निशिकांत दुबे म्हणाले. तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं म्हणत निशिकांत दुबेंनी मराठी लोकांना डिवचलं. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का?, सगळे उद्योग गुजरातकडे येतायत, असंही निशिकांत दुबेंनी सांगितले. मी मराठीचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून घाणेरडं राजकारण सुरु आहे, असा निशाणा निशिकांत दुबेंनी साधला.