BMC Recruitment 2026:राज्यात नव्या पद्धतीने लवकरच नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून ७० हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर मुंबई महापालिकेतील मोठ्या संख्येने रिक्त असलेली पदे भरण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
मुंबई महापालिकेत तब्बल ५६ हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याचे पालिका प्रशासनाने मान्य केले आहे. तर ९ हजार पदांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. त्यावेळी राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेतील रिक्त पदे भरण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली असून महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे नोकर भरतीची प्रक्रिया महापालिकेतही सुरू करावी अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे -बापेरकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून केली आहे.
इतकी पदे रिक्त … याबाबत पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मुंबई महानगरपालिकेत सद्यस्थितीत विविध आस्थापनेवर एकूण १ लाख ४५ हजार २५६ इतकी पदे आहेत. त्यापैकी ८९ हजार १३० इतकी पदे कार्यरत असून ५६ हजार १२६ पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध संवर्गाची एकूण ९ हजार २९५ पदांची भरती प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. त्यापैकी ५ हजार ४८६ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. उर्वरित पदांची आवश्यकता व निकड विचारात घेऊन टप्प्याटप्प्याने पदभरती करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पदे कमी करण्याचे सुतोवाच
दरम्यान, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महसूली खर्च कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेत पदे कमी करण्याबाबतही सुतोवाच केले आहे. संगणकीय युगात पूर्वीच्या कामाच्या पद्धतीत आमुलाग्र बदल झाले आहेत.
त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या सुधारित स्वरुपानुसार कर्मचाऱ्यांच्या आस्थापनीय रचनेचा फेरआढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे यात म्हटले आहे. आतापर्यंत एकूण २७ खात्यांचे आस्थापना अद्ययावत करण्यात आले आहे. यामध्ये पदांच्या अर्हतेचा आढावा घेणे, पदांच्या संख्येत घट किंवा वाढ करणे, कालबाह्य झालेले भत्ते बंद करणे या बाबींचा समावेश आहे.