Driving License: श्रेणीआधारित वाहन परवाना लवकरच सुरू, नियम मोडल्यास थेट लायसन्स होणार रद्द.Driving License New Rule 2026

Driving License New Rule 2026:रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच श्रेणीआधारित वाहन परवाना पद्धत सुरू करणार आहे. त्यासह इतर महत्त्वाचे निर्देश देखील नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.

जबाबदारीने वाहन चालवण्यासह रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकार श्रेणीआधारित लायसन्स पद्धत सुरू करणार आहे. वाहतुकीचे नियम वारंवार मोडल्यास लायसन्स रद्द करण्याची तरतूदही त्यात असेल, असे स्पष्ट संकेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिले.

दरवर्षी अनेक अपघात

‘भारतीय उद्योग महासंघा’ने (सीआयआय) आयोजित केलेल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेत नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. ‘दरवर्षी देशभरात रस्ते अपघातांमध्ये सुमारे १ लाख ८० हजार जणांचा मृत्यू होतो. मोबाइलवर बोलत वाहन चालवणे, अतिवेग, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे आणि मद्यपान करून वाहन चालवणे अशी कारणे या अपघातांमागे आहेत’, असे गडकरी यांनी सांगितले.

‘लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. रस्ते सुरक्षेसाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. मात्र, नियमांची अंमलबजावणी हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. नियम-कायद्यांचा आदर किंवा भय राहिलेले नाही. त्यामुळे वाहने जबाबदारीने चालवण्यासाठी लायसन्सकरीता श्रेणीनिहाय पद्धत आणणार आहोत. ही योजना लवकरच लागू करण्यात येणार आहे’, असे गडकरी म्हणाले.

खोदकामावेळीच करणार कामे

दरम्यान, पुण्यात विकसित केलेले रस्ते वारंवार खोदले जाऊ नयेत आणि पुनर्डांबरीकरणाआधी एकाच वेळी सर्व कामे व्हावीत, यासाठी आता रस्त्याचे काम करतानाच सांडपाणी वाहिन्या, पावसाळी गटारे आणि केबल डक्टची कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिकेने रस्ते विकसित अथवा पुनर्डांबरीकरण केल्यावर पथ विभागासह अन्य विभाग ते पुन्हा खोदतात. तातडीच्या कामांसह वाहिन्या टाकणे व अन्य कारणांसाठी हे खोदकाम होते. या विभागांत समन्वय नसल्याने नव्याने केलेले रस्ते काही दिवसांतच खोदले जातात.

Leave a Comment