राष्ट्रवादी विलीनीकरणावर सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधणार; विरोध करणाऱ्या या 5 आमदाराची हकालपट्टी होणार? NCP Party Marge New Update

NCP Party Marge New Update:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षातील सर्व आमदारांची मुंबईत बैठक घेणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार आमदारांची मते जाणून घेतील. आमदारांच्या बैठकीबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी पुष्टी दिली. मंगळवारी सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माहितीनुसार, सुनेत्रा पवार प्रत्येक आमदारांनी वन टू वन चर्चा करत विलीनीकरणावर त्यांची मते जाणून घेतील. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमदारांची मते विचारात घेतली पाहिजेत असे अनेक नेत्यांनी मांडलेल्या प्रतिक्रियेनंतर हे पाऊल उचलण्यात येत आहे. नेतृत्वाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी आणि त्यांना विश्वासात घेऊन पुढील वाटचाल करावी. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्व आमदारांची बैठक बोलावली पाहिजे. हा निर्णय सामूहिकपणे घेतला पाहिजे. आम्ही नेतृत्वाकडे मत मांडू असं पूसद येथील पक्षाचे आमदार आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी म्हटलं.

तर दुसरीकडे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी पक्षातील ४० पैकी ३५ आमदार हे विलीनीकरणाच्या बाजूने आहेत. आम्हालाही दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण हवे. तीच अजितदादांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल. मी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करताना माझे मत मांडले आहे असं त्यांनी कबूल केले. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार होत्या. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठकांचा सिलसिला सुरू होता. अजित पवार विलिनीकरणाबाबत आग्रही होते. परंतु त्यांच्या अचानक निधनाने या चर्चा थांबल्या असं राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते बोलत आहेत.

दरम्यान, मंगळवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचा अजेंडा सांगण्यात आला नाही परंतु त्यात विलीनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या वैयक्तिक सर्व आमदारांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेणार आहे असं पुण्यातील पक्षाच्या एका आमदाराने सांगितले. तर यापुढे पक्षांतर्गत विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. कुठलाही नेता या विषयावर जाहीरपणे बोलणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

विलीनीकरणाच्या चर्चेला नकार

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या तात्काळ चर्चेला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नकार दिला आहे. याचा सर्वस्वी निर्णय सुनेत्रा पवार यांच्यावर अवलंबून असेल. प्राधान्याने पक्ष सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मजबूत करणे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणे यादृष्टीने काम करत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतरच विलीनीकरणाचा मुद्दा हाती घेतला जाईल आणि निर्णय त्या घेतील असं भुजबळांनी स्पष्ट केले.

Leave a Comment