PM Kisan Yojana : केंद्र सरकारने नुकताच पंजाब,उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता जारी केला. या राज्यांत पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत म्हणून २१ व्या हप्त्याची रक्कम आगाऊ स्वरुपात देण्यात आली. आता उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांना २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २६ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील कृषी भवन येथून पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता वितरीत केला. २१ व्या हप्त्याचे ५४० कोटी रुपये २७ लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांना २१ वा हप्ता वितरीत करण्याची तयारी आधीच केली आहे. पण, तो कधी जमा केला जाणार? याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
पूरग्रस्त तीन राज्यांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवताना मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी, सरकार सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे म्हटले होते. केंद्र सरकार तुमच्यासोबत असून तुम्हाला या संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल, असे त्यांनी आश्वस्त केले.
ते पुढे म्हणाले की, हे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना सध्याची तातडीची घरगुती गरज पूर्ण करण्यास, रब्बी हंगामातील पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यास आणि पुन्हा शेतीची कामे सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळवून देण्यास मदत करेल, असेही त्यांनी नमूद केले.
२१ वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसानचा २१ वा हप्ता दिवाळीपूर्वी जारी केला जाऊ शकतो. या वर्षी दिवाळी २० आणि २१ ऑक्टोबर दरम्यान आहे. यामुळे २ हजार रुपयांचा हप्ता दिवाळी सणाच्या काही दिवस आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची दाट शक्यता आहे. असे झाले तर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मिळालेली ही दिवाळी भेट असेल.