Weather Alert : आज विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा या 19 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि सरी सुरूच आहेत. 24 सप्टेंबर रोजी राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण आणि मुंबई परिसर
कोकण पट्ट्यात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसू शकतो. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चारही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित असून समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातही पावसाचा धोका कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. या भागांतील शेतकऱ्यांनी पिकांवर विजेचा परिणाम टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहमदनगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भ
विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही, मात्र अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नद्या-नाल्यांमध्ये पाणी पातळी वाढण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
नागरिकांना सूचना
हवामान विभागाच्या या अंदाजानुसार, 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी सुरू राहतील. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीज कडकडत असताना झाडाखाली उभे राहू नये, नदी-नाल्याच्या पाण्यात उतरू नये, तसेच घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.