Teacher Recruitment 2026:राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ४,८६० समूह साधन केंद्रांवर आता प्रत्येकी एक क्रीडा शिक्षक आणि एक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
यामुळे राज्यात एकूण ९,७२० नवीन पदांचा समावेश असलेला स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी दिल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने काढला आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकीय संवर्गातील एकूण पायाभूत
राज्य शासनाकडून ९,७२० पदांना मंजुरी
पदांची संख्या २,३६,२८८ इतकी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही नवीन पदे निर्माण करताना मूळ मंजूर पदांची मर्यादा ओलांडली जाणार नाही, याची दक्षता शासनाने घेतली आहे.
उपलब्ध मर्यादेतच या दोन नवीन संवर्गाचे समायोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक समूह साधन केंद्रावर १ पद याप्रमाणे राज्यात एकूण ४,८६० क्रीडा शिक्षकांची पदे निर्माण झाली आहेत.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येक केंद्रावर १ याप्रमाणे एकूण ४,८६० पदे मंजूर करण्यात आली आहेत. या दोन्ही नवीन संवर्गांची बिंदू नामावली जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर आणि शिल्लक पायाभूत पदांचा तपशील जाहीर केले आहेत. संचमान्यतेनुसार एखाद्या जिल्ह्यात पदांची संख्या कमी-जास्त भासल्यास राज्यस्तरावरील एकूण मर्यादेत राहून पदे समायोजित करण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांना देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.