State Employees Helmet Vear New GR :महाराष्ट्र राज्यात गेल्या दहा वर्षांचा झालेल्या एकूण वाहतूक अपघातातील दुचाकीस्वार / रायडर यांचे प्राणांतिक अपघात तसेच गंभीर दुखापत अपघात याबाबत अभ्यासलेल्या आकडेवारीत दरवर्षी अपघातात मरण पावलेल्या गंभीर दुखापत झालेल्या नागरिकांपैकी सरासरी ३५ ते ४० टक्के अपघात दुचाकीस्वार / रायडर यांचे आहेत. हेल्मेट वापरल्याने प्राणांतिक अपघाताची तसेच गंभीर दुखापतीची शक्यता कमी होते.
या अनुषंगाने पोलीसांनी हेल्मेट अंमलबजावणी कशी करावी याबाबत वेळोवेळी कायदेविषयक प्रशिक्षण जिल्हा व आयुक्तालय स्तरावर देण्यात येते. तरीदेखील मुंबई व नागपूर व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अन्य सर्व शहरे आणि जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत अंमलबजावणी समाधानकारक नाही. विशेष म्हणजे नमूद दोन शहरे वगळून अन्य जिल्हे व शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील हेल्मेट घालण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
Bloomberg Philathroples Initiative For Global Road Safety यांचे स्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत दर सहामाहीस महाराष्ट्रातील शहरे व जिल्ह्यात योग्यरित्या हेल्मेट वापरणारे, अयोग्यरित्या हेल्मेट घालणारे तसेच हेल्मेट न घालणारे अशी तुलनात्मक माहिती गोळा केली जाते. या माहितीनुसार फक्त मुंबई आणि नागपूर या दोन शहरांत हेल्मेट वापरणारे दुचाकीस्वारांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक असून अन्य सर्व शहरे व जिल्ह्यात ही संख्या २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून येते.
या अनुषंगाने सर्व आयुक्तालये व जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्तीने हेल्मेटचा वापर करण्याबाबत त्वरीत प्रभावाने खाली नमूद प्रमाणे परिपत्रक जारी करुन त्याबाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास विनाविलंब सादर करावा.
वाहतूक कायदा कलम- १९४ डी अन्वये प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट घालणे आवश्यक असून हेल्मेटमुळे जिवितहानी /गंभीर दुखापत टाळली जाऊ शकते. त्यामुळे कायदयाची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीसांनी हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य आहे.
दुचाकी चालवताना हेल्मेट न घातलेल्या अधिकारी / अंमलदारांचा फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्यास संबंधित पोलीस अधिकारी / कर्मचाऱ्यावर मोटार वाहन कायदयानुसार दंड वसूल केला जाईल. तसेच त्यांनी जाणूनबुजून कायक्याचा भंग केल्याचे सम्जत त्याबाबत सेवापुस्तकात नोंद घेण्यात येईल.