sanjay gandhi niradhar yojana new update:विशेष साहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक अर्थसाहाय्याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१९-२० या वर्षीचा अर्थसंकल्प विधिमंडळाला सादर करताना याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार, ७ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनांच्या राज्यातील ३२ लाख लाभार्थ्यांना वाढीव अर्थसाहाय्याचा लाभ मिळणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये मिळत होते. त्यात ४०० रुपयांची वाढ करून हे अर्थसाहाय्य आता दरमहा १ हजार रुपये असे करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार यासंबंधीच्या प्रस्तावास राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या दोन्ही योजनेत लाभ घेणाऱ्या विधवा लाभार्थ्यांना १ अपत्य असल्यास ११०० व २ अपत्ये असल्यास दरमहा १२०० रुपयांचे वाढीव अर्थसाहाय्य मिळेल, असेही अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे या लाभार्थ्यांना वाढीव अर्थसाहाय्याचा लाभ मिळेल. यामुळे शासनावर वार्षिक १६४७कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार आहे.
विशेष सहाय्य योजनेंतर्गत अर्थसाहाय्य दिल्या जाणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या अचूक करून त्या संगणकीकृत करण्याचे तसेच लाभार्थ्यांना हे अर्थसाहाय्य नियमित मिळेल, अशी ऑनलाईन व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश आपण दिले आहेत, ती व्यवस्थाही लवकरच होईल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.