Pochkhra Yojana2026:ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोक्रा – टप्पा २) अंतर्गत आता महिला बचत गटांना ‘कृषी औजारे बँक’ स्थापन करण्यासाठी तब्बल २४ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. या योजनेमुळे शेतीमध्ये ‘यांत्रिकीकरण होण्याचा वेग वाढणार आहे.
मजुरांवरील अवलंबित्व कमी करणे तसेच शेतीची कामे वेळेवर,कमी वेळात व कमी खर्चात पूर्ण करणे, या उद्देशाने सध्या पारंपरिक पद्धतीऐवजी शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढत आहे. मात्र,अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रसामग्री खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ही अडचण ओळखून गावस्तरावरच भाडेतत्त्वावर यंत्रे उपलब्ध करून देण्याचा भाग म्हणून कृषी विभागातर्फे हा प्रकल्प राबविला जात आहे. यामुळे शेतीकामातील मजुरीचा खर्च कमी होऊन कामांना गती मिळणार आहे. विशेषतः हवामान बदलाच्या काळात वेळेवर पेरणी आणि काढणी करण्यासाठी ही ‘यंत्र बँक’ गेमचेंजर ठरणार आहे.
कोणाला घेता येईल लाभ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष निश्चित केले आहेत. पोक्रा योजनेत निवड झालेल्या गावांमधील ‘उमेद’ किंवा ‘माविम’ अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट आणि ग्रामसंघ या योजनेसाठी पात्र असणार आहेत. शिवाय बचत गटांमध्ये किमान १० सदस्य असणे अनिवार्य करण्यात आले आहे. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास ‘ऑनलाईन लॉटरी’ पद्धतीने निवड केली जाईल. ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी औजारे बँकेचा लाभ घेतला आहे, ते गट या योजनेसाठी पुन्हा लाभ घेण्यात पात्र नाहीत.
कोणती यंत्रे मिळणार आहेत ?
या योजनेत बचत गटांना प्रकल्प मूल्याच्या ६० टक्के अनुदान दिले जाणार असून अनुदानाची कमाल मर्यादा २४ लाख रुपये असणार आहे. जर प्रकल्पाची किंमत २० लाखांपेक्षा होणार असेल, तर संबंधित गटाला बँक कर्ज घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. लाभ घेणाऱ्या बचत गटांनी आपल्या भागातील पीक पद्धतीनुसार ट्रॅक्टर (पूरक अवजारांसह),बीबीएफ यंत्र, बेड मेकर व पेरणी यंत्र,मळणी यंत्र व इतर हवामान अनुकूल औजारे व यंत्रांची निवड करता येणार आहे.
अर्ज कसा करावा?
इच्छुक महिला बचत गटांनी ‘एफपीओ-डीबीटी पोर्टल‘या वेब प्लॅटफॉर्मवर किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत गटाचे बँक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.दरम्यान, शेतीचा विकास तसेच उत्पन्न वाढीसाठी महिला बचत गटांनी या योजनेचा लाभ घेऊन गावातील शेतकऱ्यांना माफक दरात सेवा उपलब्ध करून द्यावी,असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळाला http://www.ndksp.mahapocra.gov.in भेट द्यावी,असेही काशिद यांनी कळविले आहे.