एसटी प्रवाशांसाठी नवा नियम; सवलतींसाठी आता NCMC कार्ड अनिवार्य.NCMC Card Travelling

NCMC Card Travelling:राज्यातील एसटीने प्रवास (Pune)करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा बदल जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत आधार कार्ड किंवा साधे ओळखपत्र दाखवून सवलतीत प्रवास करता येत होता; मात्र आता सवलत मिळवण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) बंधनकारक करण्यात आले आहे. कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही आणि पूर्ण भाडे भरावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणावर होणार परिणाम?

महिलांना मिळणारी अर्ध्या दरातील तिकिटाची सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी १०० टक्के सवलत आता या नव्या कार्डाशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे सवलतीच्या प्रवासासाठी प्रत्येक पात्र प्रवाशाकडे NCMC कार्ड असणे आवश्यक राहणार आहे.

प्रशासनाचा दावा काय?

राज्य परिवहन विभागाच्या मते, या बदलामुळे प्रवास व्यवस्था अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होईल. सवलतींची अचूक नोंद, रोखरहित व्यवहार आणि शासनाकडून होणारी प्रतिपूर्ती यामध्ये पारदर्शकता येईल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच कॅशलेस व्यवहारांना चालना देणे हा या निर्णयामागील महत्त्वाचा हेतू असल्याचे सांगितले जाते.

ग्रामीण भागात नाराजी

हा निर्णय प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचा असला तरी ग्रामीण भागातील प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कार्ड काढण्यासाठी केंद्रांवर जावे लागणे, रांगेत उभे राहणे, वेळेवर रिचार्ज करणे तसेच तांत्रिक अडचणी हाताळणे या गोष्टी ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण महिलांसाठी त्रासदायक ठरू शकतात. आधी फक्त ओळखपत्रावर मिळणारी सवलत आता अधिक किचकट करण्यात आल्याची भावना काही प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

NCMC कार्ड कसे मिळवायचे?

कार्ड काढण्यासाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे, त्यांनी ते जमा केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड मिळेल.

हे कार्ड केवळ ओळखपत्र नसून प्री-पेड वॉलेटप्रमाणे कार्य करेल.

किमान १०० रुपयांचा शिल्लक ठेवणे आवश्यक राहील.

५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध असेल.

या नव्या नियमामुळे सुरुवातीला काही अडचणी येण्याची शक्यता असली, तरी प्रशासनाच्या मते दीर्घकालीन दृष्टीने ही व्यवस्था अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक ठरेल. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांना सुविधा मिळते की मनस्ताप, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Leave a Comment