Mumbai rains local viral video: मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोर पकडला आहे. पुढील चार तासांसाठी मुंबईसाठी अलर्ट मोड देण्यात आला आहे. रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या काळात धुवाधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच मुंबईकरांनो घराबाहेर पडताना विचार करुनच घरबाहेर पडा. सध्या मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन आणि माटुंगा रेल्वे स्टेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेलंय तर माटुंगा रेल्वे स्टेशनवरही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनवर खूप पाणी साचलं असून संपूर्ण रूळ पाण्याखाली गेले आहेत तर प्लॅटफॉर्मवरही पाणी आलं आहे. तर दुसरीकडे माटुंगा स्टेशनवरही रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी लोकही प्लॅटफॉर्मवर उतरलेले दिसत आहेत. रेल्वे स्थानकांत सकाळपासूनच काही प्रमाणात पाणी साचलेले दिसले. विशेषतः कुर्ला, सायन, चेंबूर, वाशी, नेरुळ, ठाणे, ऐरोली आदी भागातील स्थानकांवर पाण्याचा साठा होत असल्याने गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गाड्या मंदावून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
समुद्र किनाऱ्यांजवळ वाऱ्याचा वेग देखील अधिक आहे. वांद्रे वरळी सी-लिंक परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. सोबतच, दृश्यमानता देखील घटल्यानं चित्र आहे. सी-लिंकवरुन दिसणारे माहिम, दादर, वरळी हे भाग ढगांच्या दाटीमुळे हरवल्याचं चित्र आहे. मुंबई उपनगरांत मागील २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विक्रोळी परिसरात सर्वाधिक २५५.५मिमी पाऊस झाला आहे. सोबतच, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात देखील अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
पाहा व्हिडीओ
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या ‘रेड अलर्ट’ च्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांसाठी ‘सुरक्षा संकेत’ जारी केले आहेत. पावसाळ्यात प्रवास करताना प्रवाशांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. फूटबोर्डवर उभे राहून प्रवास न करणे, रुळांवर पाणी साचल्यास रुळ ओलांडू नये, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे तसेच संयम ठेवावा अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.