Maharashtra Weather Update: राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातलाय. विदर्भात संततधार सुरु असून नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. अनेक भागांत पूरसदृश स्थिती तयार झालीय. सकल भागात पाणीच पाणी झालं असून जनजीवन विस्कळीत झालंय. जुलै महिन्यात राज्यभरात समाधानकारक मान्सून झालाय. असून सरासरीच्या 99 टक्के पाऊस झालाय. दरम्यान पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचे अलर्ट भारतीय हवामान विभागाने (IMD) दिले आहेत. (Rain Update)
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या नव्या अपडेटनुसार, राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
ऑरेंज अलर्ट-
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,
गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम,
रत्नागिरी
यलो अलर्ट-
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक,छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी,नांदेड, अकोला
गडचिरोली जिल्ह्याला पुराचा धोका
गडचिरोलीत कालपासून जिल्ह्यात संततदार पाऊस सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले असून साडेतीन लाखपेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी आज सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता असून मोठ्या पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. गडचिरोली जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट तर आज मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी या तालुक्यात वैनगंगा तर अहेरी, सिरोंचा या तालुक्यात प्राणहिता नदीच्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
भंडाऱ्यात पावसाने दाणादाण
मागील 24 तासापासून भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस पडतोय. परिणामी, भंडारा जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे भंडारा जिल्ह्यातील सहापेक्षा अधिक जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर गोशेखर धरणाच्या पालक क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने धरणाचा पाण्याचा जलसाठा ही मोठ्या प्रमाणात वाढलाय. परिणामी धरण प्रशासनाने आज पहाटेपासून सर्व 33 दरवाज्यांमधून सुमारे 2 लाख 86 हजार क्युसेक पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. भंडारी शहरातील काही सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरातील जीवन उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय.
गोंदिया जिल्ह्यात हाजरा धबधबा प्रवाहीत…
गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सालेकसा तालुक्यातील हाजरा धबधबा प्रवाहित झाला आहे… यावर्षी पहिल्यांदाच धबधबा प्रवाहित झाला असून या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पहायला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. हा धबधबा आता पाहण्यासाठी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिक यांची गर्दी वाढणार आहे….
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा