दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ! उद्यापासून मिळणार परीक्षेचे हॉलतिकीट
Maharashtra SSC Hall Tickets 2026 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होत असून, या परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (हॉलतिकिटे) मंगळवार पासून शाळांमार्फत उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होत असून, या परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (हॉलतिकिटे) मंगळवार (ता. २०) पासून शाळांमार्फत उपलब्ध होणार आहेत. याबाबत शिक्षण मंडळाने शाळांसाठी सविस्तर सूचना जारी केल्या आहेत.
माध्यमिक शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. ‘अॅडमिट कार्ड’ या लिंकद्वारे प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येणार असून, शाळांनी ती प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत. प्रवेशपत्र देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्याध्यापकांनी डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रावर स्वाक्षरी व शिक्का मारणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या नावात, पालकांच्या नावात दुरुस्ती आवश्यक असल्यास ‘अॅप्लिकेशन करेक्शन’ या लिंकद्वारे ऑनलाइन दुरुस्ती करता येईल. प्रवेशपत्रावरील छायाचित्र अस्पष्ट किंवा सदोष असल्यास, संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून त्यावर मुख्याध्यापकांनी शिक्का व स्वाक्षरी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांची उजळणी
लेखी परीक्षेला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची लगबग वाढली आहे. अनेक विद्यार्थी सध्या अभ्यासाची उजळणी करत असून, शिक्षकांशी संवाद साधून शंकांचे निरसन करत आहेत.
सराव परीक्षांद्वारे लेखनाचा सराव, वेळेचे नियोजन यावर भर दिला जात आहे. लेखी परीक्षेसोबतच तोंडी परीक्षा व इतर प्रक्रिया येत्या काही दिवसांत पार पडणार असल्याने विद्यार्थ्यांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा