Maharashtra Land Records Employee Salary Update: भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध 15 दिवसांत; वेतनवाढ सहा महिन्यांत
भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध येत्या 15 दिवसांत, तर सुधारित वेतनश्रेणी वाढ सहा महिन्यांत होईल. याबाबतचे दोन्ही प्रस्ताव अनुक्रमे मंत्रालय आणि वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले असून, निधीची देखील मागणी करण्यात आली आहे.
भूमी अभिलेख विभागाचे राज्यातील विविध विभागांतील कर्मचारी संपावर जाणार होते. तत्पूर्वी जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे तसेच नवीन आयुक्त शैलेश नवाल, अप्पर आयुक्त ज्ञानेश्वर खिलारी यांच्या समवेत राज्यातील महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी पुणे विभाग, विदर्भ, (अमरावती, नागपूर) यांच्या समवेत बैठक पार पडली.
या बैठकीस संघटनेचे पदाधिकारी विजय पिसाळ (अध्यक्ष, पुणे विभाग), अजित लांडे (सरचिटणीस, पुणे विभाग), श्रीराम खिरेकर (विदर्भ विभाग), दिलीपराव गर्जे (अध्या विदर्भ), सदानंद मोरडे, दीपक शेळके, विनायक वाघचौरे, श्रीधर नायकवडी, आनंद लखदिवे, तानाजी सावंत आणि राहुल भोसले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांसमवेत सोमवारी (दि.23) बैठक पार पडली
या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार वेतनश्रेणी, आकृतिबंध याबरोबरच ई-मोजणी 2.0 मध्ये असलेल्या त्रुटींबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सुटीच्या दिवशी कर्मचारी यांनी काम नको, याबाबत चर्चा करण्यात आली.
याबरोबरच पोस्टाने पाठविण्यात येणाऱ्या नोटिशीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच संघटनांनी संप करण्याच्या आततायी मार्गाचा अवलंब करू नये, यावर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.