Local Train Viral Video: बांद्रा रेल्वे स्टेशनवरील एक व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर लोकांच्या वागणुकीबद्दल आणि जबाबदारीबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला रील शूट करताना एका पुरुषावर हल्ला करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पुरुषाला मारताना दिसते, कारण त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये, काळा टॉप आणि राखाडी जीन्स घातलेली एक महिला फोनवर बोलत असलेल्या एका पुरुषाशी वाद घालताना आणि त्याला मारताना दिसते.
व्हायरल व्हिडीओ
FPJच्या वृत्तानुसार ती महिला रेकॉर्डिंग करत असताना त्या पुरुषाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असा तिचा आरोप होता. हा वाद वाढला आणि आजूबाजूच्या लोकांचं लक्ष वेधलं.
या महिलेचा हा व्हिडीओ व्हायरल होताच आता अजून एक दुसरा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात काहीतरी वेगळीच परिस्थिती दिसतेय. या व्हिडिओमध्ये तीच महिला मुंबई लोकल ट्रेनमध्ये दिसते, जिथे ती रील शूट करताना प्रवास करणाऱ्या एका पुरूषाला त्याच्या परवानगीशिवाय स्पर्श करताना दिसते.
हे दोन्ही व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाले असून, सोशल मीडियावर याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. लोक या दोन्ही घटनांचा संदर्भ काय आहे याबद्दल प्रश्न विचारत आहेत आणि सार्वजनिक वागणुकीतील दुहेरी मापदंडांबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.
हे व्हिडिओ X (ट्विटर) वर NCMIndia Council For Men Affairs यांनी शेअर केले. त्यांनी या घटनेवर टीका करत मुंबई पोलिसांना टॅग करून कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुंबई पोलिसांनी त्या पोस्टची दखल घेतली आणि हा प्रकार रेल्वे परिसरात घडल्यामुळे प्रकरण GRP मुंबईकडे (रेल्वे पोलिसांकडे) पाठवले.
मुंबई पोलिसांच्या प्रतिसादामुळे नेटकरी नाराज
मात्र, मुंबई पोलिसांचा हा प्रतिसाद अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांना पसंत पडला नाही. काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पोलिस तात्काळ कारवाई करण्याऐवजी जबाबदारी टाळत आहेत, असा आरोप केला. तर काहींनी सखोल चौकशी करून खरी माहिती समोर आणावी आणि कोणाचीही चूक असली तरी त्याची जबाबदारी ठरवावी, अशी मागणी केली.
सध्या या व्हिडिओ कधी शूट केले गेले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, तसेच या प्रकरणात कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे का, याबाबतही अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.