Land Record Update Today:पुढील तीन ते साडेतीन वर्षे निवडणूका होणार नसल्याने यंदा मालमत्तांच्या बाजारमूल्य दरात अर्थात रेडीरेकनर दरात ८ ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शहरात यंदा सरासरी ८ ते १० टक्के तर ग्रामीण भागासाठी सरासरी ५ ते ७ टक्के वाढ पुढील आर्थिक वर्षाच्या (२०२६-२७) रेडीरेकनरच्या दरात प्रस्तावित केली आहे.
राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडील नगररचना व मूल्यांकन विभागाने पुढील आर्थिक वर्षाच्या रेडीरेकनरचे नवे दर प्रस्तावित केले आहे.
गेल्या वर्षी २०२५-२६ मध्ये झालेल्या व्यवहारांची खरेदी-विक्रीचे आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये कोणत्या परिसरात वाढ दिसत आहे, याची मांडणी करण्यात आली.
त्यानुसार ही वाढ प्रस्तावित करण्यात आली असल्याचे नगररचना व मूल्यांकन विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबतचा अहवाल मान्यतेसाठी लवकरच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे.
राज्य शासनाच्या मान्यतेनंतर रेडीरेकनरचे नवे दर लागू केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे नागरिकांना सदनिका खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
जमिनीच्या दरात होणार वाढ◼️ ग्रामीण भागात रिंगरोडची कामे सुरू आहे. तर काही मोठे रस्ते, मेट्रो प्रकल्प, रेल्वे मार्ग प्रस्तावित आहेत.
◼️ यासह पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी भूसंपादनाचे कामही सुरू होणार आहे. यासह मोठ्या नगर रचना योजना प्रस्तावित आहेत.
◼️ जिल्ह्यातील हे मोठे प्रकल्प, नव्याने येणाऱ्या कंपन्या यामुळे ग्रामीण भागात शेतजमिनींच्या दरात वाढ प्रस्तावित केली आहे.
◼️ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरालगतची गावे ही प्रामुख्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत येतात. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे.
◼️ त्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीतही सरासरी ८ ते १० टक्के इतकी वाढ प्रस्तावित केली असल्याचे समजते.