KDMC Recruitment 2025:कल्याण-डोंबिवली महापालिकेत लवकरच मोठ्या प्रमाणावर नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या अंतर्गत १,०७६ पदांची भरती करण्यात येणार असून, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सुमारे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या महापालिकेत कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेगाने होत असताना, त्या तुलनेत नवीन भरती न झाल्याने प्रशासनावर ताण निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने २०२१ मध्ये ७५७ पदांच्या भरतीस मंजुरी दिली होती. मात्र, या दरम्यान महापालिकेतील ३०० हून अधिक कर्मचारी निवृत्त झाले. त्यामुळे सध्याच्या गरजेनुसार १,०७६ पदे भरण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सन १९९५ नंतर ही पहिलीच मोठी भरती असून, ती ‘टीसीएस’ कंपनीच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. नुकतीच आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधी आढावा बैठक घेण्यात आली.
१९९५ नंतर पालिकेत भरती न झाल्याने केवळ अनुकंपा तत्वावरच काही कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती. तसेच आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर पदोन्नतीच्या माध्यमातून काही पदे भरली गेली. मात्र, अजूनही तांत्रिक, आरोग्य, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील अनेक पदे रिक्त असून, यामुळे प्रशासनाचा कारभार सांभाळताना अडचणी निर्माण होत आहेत.
पालिकेतील भरती प्रक्रिया लांबण्यामागे प्रशासकीय राजवट ही एक मुख्य अडचण ठरली आहे. २०२१ मध्ये शासनाने मंजुरी दिली असली, तरी लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. अनेक वर्षांपासून ही भरती प्रलंबित होती, त्यामुळे शासकीय नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणाईला मोठा धक्का बसला होता.
आता मात्र, प्रशासनाने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे ठोस पाऊल उचलले असून, सर्व विभागांतील एकूण १,०७६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, टीसीएस कंपनीमार्फत जाहिरात प्रसिद्ध करून राबवली जाणार आहे. यासाठी २ मे रोजी झालेल्या बैठकीत भरती प्रक्रियेची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.
शेवटी, ही भरती एक मोठी संधी असली तरी काहीजण यामध्ये अपारदर्शकता निर्माण होण्याची शक्यता वर्तवत आहेत. त्यामुळे भरती महासभेच्या स्थापनेनंतर व्हावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. तथापि, सध्याच्या परिस्थितीत रिक्तपदांची संख्या अधिक असल्याने शासनाच्या मान्यतेने ही प्रक्रिया प्रशासनाकडून राबवण्यात येणार आहे.
उमेदवारांना भरतीसंदर्भातील संपूर्ण माहिती, पदांची यादी आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा