IMD Weather Update:राज्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला होता, मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. मात्र आता राज्यात पाऊस पुन्हा परतणार आहे. आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
29 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सामान्य होते. सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला. आता असाच पाऊस पाऊस 29 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक डिसेंबरमध्ये ? महानगर पालिकेंची प्रभाग रचना जाहीर Municipal Corporation Election 2025
कोकणाला यलो अलर्ट जारी
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आजपासून दक्षिण कोकणात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच मंगळवार आणि बुधवारी उत्तर कोकणात म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील या भागाला पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात मॅडेन ज्युलियन ऑसिलेशनच्या प्रवेशामुळे ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान कोकण आणि गोव्यात, तसेच 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच कालावधील गुजरातमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गुजरातमधील या पावसामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रातील हवामानावर परिणान होण्याची शक्यता आहे.