IMD Rain Alert Today:महाराष्ट्रात आजपासून म्हणजेच २६ जूनपासून पुढील पाच दिवसांपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याने राज्यातील विविध भागांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
२६ ते ३० जून दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये २७ ते ३० जून या कालावधीत विशेष सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे. या भागांत वीजांचा कडकडाट, जोरदार वादळी वारे आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
नागपुरात अतिवृष्टी आणि पूरसदृश स्थिती :
बुधवारी रात्री नागपूर शहरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः हसनबाग रोड, नंदनवन कॉलनी, आणि आजूबाजूच्या परिसरात रस्त्यांवर एक फुटापर्यंत पाणी साचले. सिमेंट रस्ते उंच असल्याने नाल्यांचे पाणी थेट घरांमध्ये घुसले. त्यामुळे अनेक कुटुंबांना रात्रभर पाण्यात जागून काढावी लागली.
रात्री बारा ते एकच्या सुमारास ही परिस्थिती गंभीर होती. ८.८ मिलीमीटर पावसाची नोंद नागपुरात झाली असून, २९ जूनपर्यंत अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकमध्ये रात्रभर रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडत असून, घाटमाथ्यावरील भागात ऑरेंज अलर्ट (Orange alert) लागू केला आहे. गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पातळीत घट झाली आहे.
Weather Update | पश्चिम महाराष्ट्रात पुणे व कोल्हापूर भागात जोर
पुणे शहरात पुढील चार दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, घाटमाथ्यांवर मात्र अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यात काही भागांत हलक्या स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. मात्र जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसाअभावी सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत. दुसरीकडे, गोंदिया जिल्ह्यात अखेर दमदार पावसाने सुरुवात केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळालाय.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा