Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
Home Loan : प्रत्येकाला स्वत:चं घर असावं असं वाटतं. घर खरेदी करताना बँकांकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं. त्यामुळं कोणती बँक कमी व्याज दरावर कर्ज देतेय हे माहिती असणं आवश्यक आहे.
देशातील महानगरांसह विविध शहरांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्र जोरात आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी करण्यात येत आहे. मात्र, घरांच्या किमती अधिक असल्यानं अनेकांकडून गृहकर्ज घेण्यात येते. बँका घराच्या किमतीच्या 80 टक्क्यांपर्यंत रक्कम कर्ज म्हणून देते. भारतात गृह कर्ज वितरणाच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील बँका आघाडीवर आहेत.
Home Loan Interest Rate : गृहकर्ज व्याज दर
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका कमी व्याज दरावर गृह कर्ज देतात. गृह कर्ज वितरणाच्या बाबतीत देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आघाडीवर आहेत. त्याच्या तुलनेत खासगी क्षेत्रातील बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या अधिक व्याजदरानं कर्ज देतात.
पैसाबाझार डॉट कॉम वेबसाईटनुसार 12 नोव्हेंबरला देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका 7.35 टक्के ते 7.55 टक्के व्याज दरानं गृह कर्ज देत आहेत. व्याज दर कर्जदाराच्या प्रोफाईलवर आणि कर्जाच्या रकमेवर अवलंबून आहेत.
बँक ऑफ बडोदाकडून सध्या 7.45 टक्के व्याज दरानं गृहकर्ज देण्यात येत आहे. तर, स्टेट बँकेकडून गृहकर्ज 7.50 टक्के व्याज दरानं दिलं जात आहे. तर, यूनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियाकडून 7.35 टक्के व्याज दरानं गृहकर्ज दिलं जातंय. पंजाब नॅशनल बँकेकडन 7.45 टक्के व्याज दरानं गृहकर्ज देण्यात येत आहे.
काही बँकांकडून ज्या कर्मचाऱ्यांची पगाराची खाती त्यांच्या बँकेत असतील तर त्यांना कमी टक्क्यानं गृहकर्ज दिलं जात आहे. कॅनरा बँककेडून 5 बेसिस पॉईंट कमी करुन गृहकर्ज दिलं जात आहे.
यूको बँकेकडून 0.05 टक्के सूट महिला कर्जदारांना दिली जाते. तर, टेकओव्हर लोनसाठी 0.10 टक्क्यांची सूट दिली जाते.
देशातील खासगी क्षेत्रातील बँकांकडून सार्वजनिक बँकांच्या तुलनेत अधिक व्याज दरानं कर्ज दिलं जातंय. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेकडून 8 टक्क्यांपेक्षा कमी व्याज दरानं कर्ज दिलं जातंय. तर, एचडीएफसी बँक 7.90 टक्के तर आयसीआयसीआय बँकेकडून 7.65 टक्क्यांनी व्याज आकारलं जातं.
एक्सिस बँक, फेडरल बँक, कर्नाटक बँक गृहकर्ज 8.20 टक्क्यांनी देतात. तर, करुर व्यास बँक 10.90 टक्क्यांनी गृहकर्ज देतात. तर, बंधन बँकेकडून 8.41 टक्के तर आरबीएल बँकेकडून 8.20 टक्क्यांनी गृहकर्ज दिलं जातं.
बजाज हाऊसिंग फायनान्स, एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि आयसीआयसीआय होम फायनान्स 7.45 ते 7.50 टक्के व्याजानं गृहकर्ज देतात.पीएनबी हाऊसिंग फायनान्स आणि जीआयसी हाऊसिंग फायनान्स अनुक्रमे 8.20 टक्क्यानं आणि 11.50 टक्क्यानं गृहकर्ज देतात.
गृहकर्जदारांनी कोणती काळजी घ्यावी?
गृह कर्ज घेताना कर्जदारांनी सूट, प्रोसेसिंग फी, पात्रतेशी संबंधित सूट हे लागू केल्यानंतर प्रत्यक्ष लागू होणाऱ्या व्याज दराचा विचार करावा. 20 वर्षांच्या कर्जाच्या कालावधीचा विचार केल्यास 0.25 टक्क्यामुळं खूप परिणाम होऊ शकतो.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका पगारदार ग्राहकांना क्रेडिट स्कोअर, उत्पन्नाची स्थिरता, बँकेसोबतचे संबंध या गोष्टींचा विचार करुन अंतिम व्याज दर निश्चित करतात.