Gas Cylinder Blast Viral Video: एकामागे एक गॅस सिलेंडरचा स्फोट; पिकअप टेम्पो जळून खाक; व्हायरल व्हिडिओ पहा

Gas Cylinder Blast Viral Video:रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा हायवेवरील वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. अनेक गॅस सिलेंडरचा एकामागे एक स्फोट झाल्याने, या स्फोटाच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी, 22 जानेवारी रोजी वाशी नाका इथे गॅस सिलेंडरने भरलेल्या पिकअप टेम्पोला अचानक आग लागली. या पिकअप टेम्पोमध्ये तब्बल आठ गॅस सिलेंडर होते. या गॅस सिलेंडरला आग लागल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केलं. एकामागोमाग एक सिलेंडरे स्फोट झाले आणि काही क्षणांतच संपूर्ण वाहन जळून खाक झालं. या सिलेंडरच्या स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुदैवाने या गॅस सिलेंडरच्या स्फोटाच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सिलेंडरचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात उडाल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळावरून सुरक्षित अंतर राखत पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने वेळेत दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं, अन्यथा आजूबाजूच्या परिसराला, वस्तीला मोठा धोका निर्माण झाला असता.

महत्त्वाची बाब म्हणजे, अशाप्रकारे आगीची ही पहिलीच घटना नाही. ऑक्टोबर 2025 मध्येही वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरशी संबंधित दुर्घटना घडली होती. अवघ्या काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा अशी गंभीर घटना घडल्याने गॅस सिलेंडर वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियमांचं पालन होतं का, सिलेंडर वाहतुकीसाठी आवश्यक खबरदारी घेतली जाते का, असे सवाल उपस्थित होत, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment