Farmer Loan Stamp Duty Waived GR: शेतकऱ्यांच्या २ लाखांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, शासन आदेश जारी
शेतकऱ्यांना शेती आणि पीक कर्जाशी संबंधित २ लाखांपर्यंतच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क १ जानेवारी २०२६ पासून पूर्णतः माफ करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना शेती आणि पीक कर्जाशी संबंधित २ लाखांपर्यंतच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क १ जानेवारी २०२६ पासून पूर्णतः माफ करण्यात आले आहे. यासंदर्भात आदेश महसूल आणि वन विभागाने जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतच्या शेती अथवा पीक कर्जाशी
संबंधित निष्पादीत केलेल्या अधिस्वीकृती, रोखपत्र करारनामा, हक्कविलेख निक्षेप, हडप, तारण अथवा तारण गहाण, हमीपत्र गहाणखत, प्रतिभूती बंधपत्र, गहाणखत, गहाणाचे सूचनापत्र किंवा घोषणापत्र किंवा यास संलग्न अशा कोणत्याही संलेखावर उक्त अधिनियमांतर्गत आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क १ जानेवारी २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत पूर्णतः माफ करत असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ च्या कलम ९ च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन लोकहितास्तव पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे खात्री पटत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे शासनाने म्हटले आहे.
याआधी राज्यात सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागत असलेले ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले होते. या निर्णयाचा फायदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांनाही झाला.