College Dance Viral Video:सरकारी शाळेत डान्स आणि पैशाची उधळपट्टी करतानाचा VIRAL VIDEO, पालकांसह नेटकऱ्यांचा संताप अनावर
मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील एका सरकार शाळेत घडलेला प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शाळा म्हणजे शिक्षण, शिस्त व संस्कार देण्याचे ठिकाण असताना अशा प्रकारचा कार्यक्रम तिथे कसे काय झाला, यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ दतिया जिल्ह्यातील परसारी गावातील एका सरकारी माध्यमिक शाळेतील असल्याचे सांगितले जात आहे. हा कार्यक्रम नवीन वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शाळेच्या आवारात झाला; परंत तो शाळा सुटल्यानंतर झाला असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हा कार्यक्रम शाळेच्या वातावरणासाठी योग्य नाही, असे वाटत आहे.
व्हिडीओत एक तरुणी शाळेच्या आवारात नाचताना दिसत आहे आणि काही लोक त्या तरुणीवर पैसेही उधळताना दिसत आहेत. हा कार्यक्रम जसा सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात करतात तशा स्वरूपाचा वाटतो; पण तो शाळेच्या आवारात झाला म्हणून वाद उठला आहे. शाळेच्या भिंती, वर्ग आणि परिसर अशा कार्यक्रमासाठी वापरल्याने पालक आणि लोक नाराज झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
या प्रकारावर शाळेचे मुख्याध्यापक बलवान सिंह यांनी सांगितले की, हा कार्यक्रम शाळा सुटल्यानंतर झाला होता आणि त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, पंचायत सचिव रिंकू यादव आणि सरपंच नीलम परिहार यांनी परवानगी दिली होती; पण शिक्षण विभागाने ते मान्य न करता, चौकशी सुरू केली आहे. जिल्हा प्रकल्प समन्वयक राजेश शुक्ला यांनी मुख्याध्यापकांकडून लेखी माहिती मागवली असून, नियमांचे उल्लंघन झाले आहे का ते पाहिले जात आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. एकाने लिहिले “शाळा आहे की कार्यक्रम हॉल?” अशी टीका अनेकांनी केली आहे. “मुलांना शिस्त शिकवायची की असं काही?” असे प्रश्न विचारले गेले. काहींनी प्रशासनावरही टीका करीत, “परवानगी देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी,” अशी मागणी केली. तर काही लोकांनी शिक्षण व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीवर चिंता व्यक्त केली.