Badhkam kamgar Safety Kit:महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोदींत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) पुरविण्याच्या योजनेस शासन मान्यता देण्याबाबत.
इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) केंद्रीय नियम, १९९८ तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ अंतर्गत बांधकाम कामगारांच्या सुरक्षे विषयी विविध उपाय, जबाबदा-या, कर्तव्ये नमूद केलेली आहेत.
तथापि, आजपर्यंतचा अनुभव पाहता सदर नियमांचे मोठ्या प्रमाणात पालन होत असल्याचे दिसत नाही. जर सुरक्षेचे नियम पाळले असते तर मागील दुर्घटनेत अनेकांचे गेलेले प्राण वाचवण्यात यश आले असते.
भविष्यात अशा दुर्घटनेत बांधकाम कामगारांचे प्राण वाचावे यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने दिनांक २२ सप्टेंबर, २०१७रोजीच्या बैठकीत मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) पुरवण्यासंदर्भात ठराव पारीत केला आहे.
बांधकाम कामगारांची नोंदणी वाढविणे तसेच कामगारांची जिवीत हानी होऊ नये हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
तसेच, या योजनेद्वारे होणा-या वाटपामुळे बांधकाम कामगारांमध्ये नोंदणीचे महत्व समजेल व होणा-या जनजागृतीमुळे ते मंडळाकडे नोंदणी करण्यास आकर्षित होतील.
तसेच, बांधकाम कामगारांचे संभाव्य अपघात/दुखापत इत्यादी पासून संरक्षण होईल व अशा प्रकारच्या दुर्घटना टाळता येतील. या पार्श्वभूमीवर सदर योजना कार्यान्वित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) पुरविणे या योजनेस खालील नमूद अटींच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.
योजनेच्या अटी व शर्ती
१. मंडळाकडे नोंदणीकृत जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पत्र राहतील. या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरुन दिल्यानंतर सुरक्षा संच (Safety Kit)) पुरविण्यात यावे.
२. पात्र बांधकाम कामगारांना पुरवावयाच्या सुरक्षा संच (Safety Kit) मध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा.
१. संरक्षक शूज (सुरक्षा शूज) २. धूळ मास्क (श्वसन संरक्षण) ३. श्रवण संरक्षण (इअरप्लग) ४. सुरक्षा हेल्मेट ५. सुरक्षा हातमोजे ६. सुरक्षा हार्नेस ७. रिफ्लेक्टीव्ह जॅकेट
३. पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) पुरविण्या बाबत ई-निविदा पध्दतीचा अवलंब करुन, नोंदणीकृत, नामांकीत व अनुभवी संस्थेची निवड करावी.
तसेच या संदर्भात उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दिनांक १.१२.२०१६ मधील तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावे. तसेच निविदा स्विकृती नंतर प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करावा.
४. सुरक्षा संच (Safety Kit)) च्या निविदा स्विकृत करण्यापूर्वी सुरक्षा संच (Safety Kit) मधील वस्तूंच्या दर्जाची शासन मान्य शासन प्राधिकृत प्रयोग शाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी व तसे प्रमाणपत्र तद्नंतरच अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरणाची कार्यवाही करावी.
५. सुरक्षा संच (Safety Ka) मधील पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंचे दर, पुरवठा, वाहतूक, वितरण व सर्व करांसह निश्चित करण्यात यावे.
६. संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त यांनी रितसर प्रमाणित केलेल्या जिवीत पात्र नोंदीत बांधकाम कामगारांच्या यादीनुसारच विहीत मुदतीचे आत सुरक्षा संच (Safety Kit) चा पुरवठा करण्यात यावा.
७. पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) प्राप्त झाल्याचे सरकारी कामगार अधिकारी यांनी खात्री करावी व पुरवठा केल्याची पोचपावती उपायुक्त कामगार यांना सादर करावी.
उपायुक्त कामगार यांनी अशा सर्व लाभार्थ्यांचे साहीत्य प्राप्त झाल्याबाबतच्या पोच पावत्या पाहून खात्री करुन त्याबाबतचा अहवाल देयकाची अदायगी करण्याच्या प्रमाणपत्रासह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांना सादर करावा व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सदरहू अहवाल व उप आयुक्त कामगार यांचे देयक अदायगी करण्याचे प्रमाणपत्र पाहून, खात्री करुन पुरवठादाराचे देयक नियमानुसार प्रदान करावे.
शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
८. सुरक्षा संच (Safety Kit) पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीतून भागविण्यात यावा.
९. सदर योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणी व देखरेखीचे काम कामगार आयुक्त यांनी पहावे.
१०. पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) पुरवठा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी. कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याचे अधिकार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास राहतील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१७११२३११०६५८३५१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.