Ashok Kharat Nashik Crime News: अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ ‘स्वयंघोषित कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने अटक केली. अटकेनंतर काल अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. भविष्य जाणून घेण्यासाठी बडे बडे नेते, सेलिब्रिटी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे.
नाशिकच्या कॅनडा कॉर्नरसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये, कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातनं (Ashok Kharat) त्याचं दुकान थाटलं होतं. आपल्याच कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार करताना हा विकृत भोंदूबाबा कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर या भोंदू मांत्रिकाची कुंडली जगासमोर आली. त्यामुळे वासनांध मांत्रिकाबरोबरच, त्याच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नेत्यांचीही अडचण वाढल्याचं दिसतंय. या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे, तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर यांनीही खरातच्या दरबाराला भेट दिल्याचे समोर आले आहे.
ईशान्येश्वर मंदिर जवळ अशोक खरातचं आलिशान फार्म हाऊस- (Ashok Kharat Nashik Crime News)
कॅप्टन अशोक खरात याला अटक केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील मिरगावचे ईशानेश्वर मंदिर चर्चेत आले आहे. 16 ऑगस्ट 2010 रोजी मंदिराची स्थापना केली होती. याच मंदिराच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर कार्यरत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशानेश्वर महादेव मंदिराला भेट दिल्यानंतर मंदिर आणि अशोक खरात दोघेही चर्चेत आले. ईशान्येश्वर मंदिर जवळच अशोक खरातचा आलिशान फार्म हाऊस आहे. तिथे शनिवारी, रविवारी अशोक खरात येत असे, त्याच बरोबर, कोणी सेलिब्रिटी, व्हिआयपी आलेत तर त्यांच्यासोबत फार्महाऊसमध्ये मिटींग करत असल्याची स्थानिकांची माहिती आहे. या व्यतिरिक्त इतर शहरात देखील त्याची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचा पोलिसांनी संशय असून या मालमत्ता चा शोध घेतला जाणार आहे.
नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.