Ajit Pawar plane crash investigation:राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या चौकशीवरच काही नेते, आमदारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अजित पवार यांच्या विमानासाठी अगोदर नियुक्त केलेले ते दोन पायलट कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. बसं एवढीच माहिती मिळावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. या सर्व घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत सातत्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नागरी उड्डाण मंत्रालायने चौकशी संदर्भात मोठी माहिती दिली. त्यांनी म्हटलंय, ‘‘२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या अपघातादरम्यान दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर बराच काळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात होते आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले.”
याच मुद्द्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले. विमानाच्या शेपटीत असणारा ‘ब्लॅक बॉक्स’ जळालाच कसा? असा प्रश्न त्यांनी केला होता. त्यानंतर आज पुन्हा समाज माध्यमांवर पोस्ट टाकत त्यांनी नवीन मुद्दा उपस्थित केला. त्या विमानासाठी अगोदर नियुक्त पायटल यांच्या संदर्भात त्यांनी प्रश्न केला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, ‘‘अजितदादांच्या विमानासाठी अगोदर नियुक्त केलेले साहिल मदन आणि यश नावाचे दोन पायलट त्यादिवशी कुठे अडकले होते?, आता कुठे आहेत? बस इतकीच माहिती मिळावी. ‘ब्लॅक बॉक्स’चा डेटा रिकव्हर झाल्यावर मिळाला तरी हरकत नाही.’’ अजित पवार यांच्या विमानासाठी अगोदर नियुक्त पायलट यांच्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी नवा संशय व्यक्त केला आहे.
अनेक प्रश्नांमुळे संशयाचे धुके
पायलट का बदलले गेले? विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल संबंधित कारणांवर शासकीय कारवाई व निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने झाली? असे अनेक प्रश्न अमोल मिटकरी यांनी अगोदरच उपस्थित केले आहेत. या प्रश्नांमुळे विमान अपघात प्रकरणावर संशय व्यक्त होत आहे.