New economic changes:जुलै महिन्यात तुमच्या आर्थिक बाबींसंदर्भात अनेक बदल होणार आहेत. यात ट्रेनच्या तिकिटाच्या दरापासून ते एटीएममधून पैसे काढण्यापर्यंतच्या बदलांचा समावेश आहे.
ट्रेनचे तिकीट होणार महाग
१ जुलैपासून सामान्य माणसांसाठी ट्रेनचे तिकीट महाग होणार आहे. १ जुलैपासून नॉन-एसी डब्यांचे भाडे प्रति किलोमीटर १ पैसे आणि एसी डब्यांचे भाडे प्रति किलोमीटर २ पैसे वाढवले जाऊ शकते.
गॅस सिलिंडरचे दर बदलणार?
देशातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला स्वयंपाकाच्या गॅस आणि जेट इंधनाच्या किमतींमध्ये सुधारणा करतात. त्यामुळे, १ जुलै रोजी सिलिंडरच्या किमतीत काय बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ओटीपीशिवाय तत्काळ तिकीट बुक होणार नाही
तिकीट दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केले आहेत. १ जुलैपासून तत्काळ ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी वापरकर्त्यांना ओटीपीही द्यावा लागेल. हा ओटीपी युजर्सच्या आयआरसीटीसी खात्यात नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. १५ जुलैपासून ओटीपी आधारित तत्काळ तिकीट बुकिंग अनिवार्य होणार आहे.
पॅन कार्ड बनवण्याचा नियम बदलला, आधार लागणार
१ जुलैपासून पॅन कार्डच्या नियमांमध्येही मोठा बदल येणार आहे. सीबीडीटीने म्हटले की, १ जुलैपासून पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड देणे अनिवार्य असेल. ज्यांच्याकडे हे दोन्ही कार्ड आधीच आहेत, त्यांना ते लिंक करणे अनिवार्य असेल. यासाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.
एजंटसाठी तिकीट बुकिंग नियमांत बदल
ट्रेनच्या तत्काळ तिकीट बुकिंगदरम्यान, एजंटना १ जुलैपासून पहिल्या अर्ध्या तासात बुकिंगला परवानगी दिली जाणार नाही. यामुळे जास्तीत जास्त लोकांना तत्काळ ट्रेनचे तिकीट मिळू शकेल. याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या.
एटीएममधून पैसे काढणे झाले महाग
आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी १ जुलैपासून एटीएममधून रोख काढणे महाग होणार आहे. ३ विनामूल्य व्यवहार करता येतील. यानंतर आर्थिक व्यवहारांवर २३ रुपये व गैर-आर्थिक व्यवहारांवर ८.५ रुपये शुल्क लागेल. नॉन-मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा प्रति महिना ५ व्यवहारांची असेल.