State Employees New Pay Scale GR:राज्य शासनाने स्वीय सहाय्यक (Personal Assistant) संवर्गाच्या वेतनश्रेणीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यासंदर्भात शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. वेतन समानीकरणाच्या चौथा वेतन आयोग अहवालाच्या आधारे सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयांमध्ये स्वीय सहाय्यक संवर्गाचे स्वतंत्र पद निर्माण करण्यात आले आहे. या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदास मंत्रालयीन निवडश्रेणी लघुलेखक (Selection Grade Stenographer) यांची वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे.
यानंतर वेतनत्रुटी निवारण समिती 2024, म्हणजेच खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार वित्त विभागाने दिनांक 02 जून 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ तसेच पोलिस महासंचालक कार्यालयातील स्वीय सहाय्यक या संवर्गास पूर्वी लागू असलेली एस–16 (₹44,900–1,12,400) वेतनश्रेणी रद्द करून त्याऐवजी एस–17 (₹47,600–1,51,100) ही उच्च वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे.
याच धर्तीवर आता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 18 डिसेंबर 1995 च्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांमधील स्वीय सहाय्यक संवर्गालाही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार संबंधित स्वीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्वीची एस–16 (₹44,900–1,42,400) वेतनश्रेणी रद्द करून एस–17 (₹47,600–1,51,100) ही वेतनश्रेणी लागू करण्यात येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हा निर्णय वित्त विभागाच्या दिनांक 02 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदींच्या पूर्णतः अनुरूप असून, त्या तरतुदी जशाच्या तशा लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित सर्व स्वीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असून, यामुळे त्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे.
हा निर्णय राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या स्वीय सहाय्यक संवर्गासाठी आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरणारा असून, वेतन समानीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
