7/12 Utara Online Process Step by Step Guide : डिजीटल सातबारा (७/१२) डाऊनलोड करण्यासाठी केवळ गट नंबर व सर्वे नंबरची आवश्यकता असते. या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही पाच मिनिटात कायदेशीर मान्यता असलेला डिजीटल ७/१२ मिळवू शकता. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महाभूलेख/भूलेख या अधिकृत संकेतस्थळावर (https://bhulekh.mahabhumi.gov.in/) जावं लागेल.
या संकेतस्थळावर दोन प्रकारचे दस्तावेज मिळतात. यामध्ये शासकीय मान्यता नसलेले (शासकीय कामांसाठी वापर करता येत नाही), स्वाक्षरी नसलेले दस्तावेज मिळतात ज्यांचा केवळ माहिती तपासण्यासाठी वापर केला जातो. हे दस्तावेज पाहण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. याशिवाय येथे तुम्हाला अधिकृत स्वाक्षरी असलेले म्हणजेच डिजीटली साईन्ड डॉक्युमेंट्स मिळतात. ज्यांचा कायदेशीररित्या सरकारी कामांसाठी वापर करता येतो.
सर्वात आधी तुमचा विभाग निवडा
भूलेख हे संकेतस्थळ उघडल्यानंतर सर्वात आधी तुमचा विभाग निवडा. यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, नागपूर, नाशिक व पुणे असे विभाग आहेत. त्यानंतर डिजीटली साइन्ड ७/१२ या पर्यायावर क्लिक करा.
संकेतस्थळावर लॉग इन करा
हे संकेतस्थळ वापरण्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल. यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी पहिला पर्याय म्हणजे नवीन युजर रजिस्ट्रेशन करून स्वतःचं अकाउंट ओपन करा किंवा दुसरा पर्याय म्हणजे ओटीपी बेस्ड लॉग इन. दुसरा पर्याय तुलनेने सोपा आणि कमी वेळ घेणारा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरद्वारे येथे लॉग इन करू शकता.
रिचार्ज करा
व्हेरिफिकेशननंतर तुम्हाला तुमचं अकाउंट रिचार्ज करावं लागेल. येथे तुम्ही १५ ते १,००० रुपयांपर्यंतचा रिचार्ज करू शकता. तुम्हाला ७/१२ हवा असल्यामुळे त्यासाठीचं १५ रुपयांचं शुल्क भरावं लागेल. त्यामुळे तुम्ही १५ रुपयांचा रिचार्ज करू शकता. यासाठी क्रेडिट कार्ट, डेबिट कार्ड, यूपीआय आणि नेटबॅन्किंगचे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी कुठलाही पर्याय वापरून तुम्ही तुमचं अकाउंट रिचार्ज करा.
माहिती भरून डाऊनलोड करा तुमचा ७/१२
रिचार्ज केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तिथे तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडा. त्यानंतर अंकित ७/१२ या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा सर्व्हे नंबर व गट नंबर प्रविष्ट करा. त्याचं संयोजन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या गट क्रमांकाचा ७/१२ कोणत्या तारखेला स्वाक्षरीत झाला आहे त्या माहितीचा बॉक्स दिसेल. तिथे ओके असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या खात्यातील १५ रुपये वजा होतील असा एक संदेश दिसेल. ओके या पर्यायवर क्लिक करून १५ रुपये वजा करण्याची परवानगी द्या. त्यानंतर क्षणार्धात तुमचा ७/१२ पीडीएफ फॉरमॅटमध्ये तुमच्यासमोर दिसेल. तिथेच उजव्या बाजूला डाऊनलोडचा पर्यायही असेल. तुम्ही तो डिजीटली साइन्ड ७/१२ डाऊनलोड करू शकता. ज्याला कायदेशीर मान्यता आहे. या ७/१२ च्या पीडीएफची तुम्ही प्रिंट काढू शकता. शेअर करू शकता, सरकारी कामासाठी वापरू शकता.
इतरही दस्तावेज डाऊनलोड सुविधा
या संकेतस्थळावरून तुम्ही ८ अ चा उतारा, फेरफार व प्रॉपर्टी कार्ड देखील डाऊनलोड करू शकता. या प्रत्येक दस्तावेजासाठी आवश्यक माहिती व शुल्क वेगवेगळं आहे.