How to Check Name in Voters List Online:मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत, त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, मतदानाचा अधिकार वापरण्यापूर्वी एक महत्त्वाची बाब तपासणे गरजेचे आहे, ती म्हणजे मतदार यादीत आपले नाव आहे की नाही.
अनेक वेळा मतदारांकडे मतदान ओळखपत्र (Voter ID) असते, तरीही मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान करता येत नाही. तसेच, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र शोधताना किंवा नाव यादीत आहे की नाही हे तपासत बसल्याने गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागतो. ही अडचण टाळण्यासाठी निवडणुकीपूर्वीच मतदार यादीत आपले नाव तपासणे अत्यावश्यक आहे. सध्या ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, घरबसल्या काही मिनिटांत करता येते.
मतदार यादीत नाव कसे तपासायचे?
मतदार यादीत नाव तपासण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करता येतो. यासाठी सर्वप्रथम electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागते. या वेबसाइटवर गेल्यानंतर दोन पर्याय उपलब्ध असतात.
पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती भरावी लागते. सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्चा कोड टाकून शोध घेतल्यास तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे लगेच समजते.
दुसऱ्या पर्यायामध्ये EPIC म्हणजेच मतदार ओळखपत्र क्रमांक वापरून नाव शोधता येते. EPIC क्रमांक आणि राज्य निवडल्यावर संबंधित मतदाराची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते. या माहितीमध्ये मतदान केंद्राचा पत्ता, भाग क्रमांक आणि मतदार क्रमांकही नमूद असतो, जो मतदानाच्या दिवशी उपयुक्त ठरतो.
मतदार यादीत नाव नसेल तर काय करावे?
जर मतदार यादीत तुमचे नाव आढळले नाही, तर घाबरण्याची गरज नाही. नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरावा लागतो. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध आहे. मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीच्या माध्यमातून लॉगिन करून हा अर्ज सहज भरता येतो.
अर्जामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग तसेच वडील, आई, पती किंवा पत्नीची माहिती भरावी लागते. यासोबतच जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला किंवा स्थानिक महानगरपालिकेने जारी केलेले अधिकृत दस्तऐवज जोडणे आवश्यक असते. अर्ज सादर झाल्यानंतर निवडणूक विभागाकडून पडताळणी केली जाते आणि त्यानंतर नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाते.
काही महत्त्वाच्या टिप्स
मतदानापूर्वी किमान काही आठवडे आधी मतदार यादी तपासणे फायदेशीर ठरते
पत्ता बदलला असल्यास मतदार ओळखपत्र अद्ययावत करणे आवश्यक आहे
एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावे
मतदान केंद्र आणि भाग क्रमांक आधीच नोंदवून ठेवल्यास मतदानाच्या दिवशी वेळ वाचतो.
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्कच नव्हे, तर लोकशाहीतील महत्त्वाचे कर्तव्यही आहे, त्यामुळे कोणतीही अडचण टाळण्यासाठी निवडणुकीपूर्वीच मतदार यादीत आपले नाव तपासून, आवश्यक असल्यास नोंदणी किंवा दुरुस्ती करून घ्या आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा.
ऑनलाइन नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा