State Employees New Pay Scale:वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये १०४ संवर्गाच्या वेतनश्रेणी सुधारित करण्यात आलेल्या आहेत, सदर १०४ संवर्गामध्ये लघुलेखक संवर्गातील निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक, निवडश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ स्वीय सहायक या संवर्गांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात आली आहे.
तथापि, सदर लघुलेखक संवर्गामध्ये स्वीय सहायक पदाचा समावेश नसल्यामुळे सातव्या वेतन आयोगामधील वेतनत्रुटींचे निराकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ (खुल्लर समिती) कडे कृषि व पदुम विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ येथील स्वीय सहायक या पदास तसेच गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस महासंचालनालयामधील स्वीय सहायक पदाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.
त्यासंदर्भात वेतन समानीकरण समितीच्या (चौथा वेतन आयोग) अहवालातील परिच्छेद ३.२९ नुसार राज्यातील लघुलेखक संवर्गाचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वीय सहायक संवर्गाचे पद निर्माण केल्यास सदर पदास मंत्रालयातील निवडश्रेणी लघुलेखकाची वेतनश्रेणी देण्यात यावी.
प्रस्तुत संवर्गाला चौथ्या वेतन आयोगापासून सातव्या वेतन आयोगापर्यंत मंत्रालयीन लघुलखेक निवडश्रेणी संवर्गाची समकक्ष वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. तसेच वित्त विभागाच्या दि.१३.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये निवडश्रेणी लघुलेखक संवर्गाला वेतनश्रेणी एस-१६ : ४४९००-१४२४०० ऐवजी एस-१७ : ४७६००-१५११०० अशी लागू करण्यात आली आहे. यास्तव महाराष्ट्र
पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ व पोलीस महासंचालनालयामधील स्वीय सहायक या संवर्गाला एस-१६ : ४४९००-१४२४०० ऐवजी एस-१७: ४७६००-१५११०० वेतनश्रेणी मंजूर करण्याची शिफारस खुल्लर समितीने केली होती. सदर शिफारशीनुसार वित्त विभागाच्या दि.०२.०६.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर दोन्ही कार्यालयातल स्वीय सहायक पदाची वेतनश्रेणी सुधारित करण्यात आली आहे.
स्वीय सहायक हा संवर्ग सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संवर्गाशी समकक्ष संवर्ग असल्यामुळे सदर शासन निर्णयान्वये एकाच शासकीय कार्यालयातील स्वीय सहायक संवर्गाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय एकाच विभागापुरता न घेता सर्वसमावेश एकच निर्णय घेणे आवश्यक आहे.
यास्तव वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ (खुल्लर समिती) ने उपरोक्त नमूद कार्यालयातील स्वीय सहायक या संवर्गाला एस-१७: ४७६००-१५११०० ही सुधारित केलेली वेतनश्रेणी सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील स्वीय सहायक पदास लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक
वेतन समानीकरण समितीच्या (चौथा वेतन आयोग) अहवालातील परिच्छेद क्र.३.२१ नुसार सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्र.३ व ४ येथील शासन निर्णयान्वये क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वीय सहायक संवर्गांचे पद निर्माण करण्यात येऊन त्यास मंत्रालयीन निवडश्रेणी लघुलेखकांची वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे.
तसेच वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ (खुल्लर समिती) च्या शिफारशीनुसार वित्त विभागाच्या दि.०२.०६.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ व पोलीस महासंचालनालय कार्यालयातील स्वीय सहायक या संवर्गाला एस-१६ ४४९००-१४२४०० ऐवजी एस-१७: ४७६००-१५११०० वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे.
त्याच धर्तीवर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग दि.१८.१२.१९९५ नुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांमधील स्वीय सहायक या संवर्गाला एस-१६:४४९००-१४२४०० ऐवजी एस-१७ : ४७६००-१५११०० अशी वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०६.२०२५ मध्ये नमूद केलेल्या तरतूदी जशाच्या तशा लागू राहतील.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रांक २०२५१२१९१६४७०८५३०५ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
