मतदार यादीत नाव कसे नोंदवता येते? काय आहे प्रक्रिया? कोणती कागदपत्रे आवश्यक? Voter Registration Process in Marathi

Voter Registration Process in Marathi : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कथित मतचोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहे. मतदार यादीत अनेक मतदारांची दुबार नावे असल्याचा आरोप विरोधकांच्या इंडिया आघाडीने केला आहे; तर पराभव पचवता येत नसल्यामुळे विरोधक त्याचे खापर निवडणूक आयोगावर फोडत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? असा प्रश्न काहींना पडला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी २० डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मतदान यादीत नाव नव्याने नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाइन संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्याद्वारे नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत आपले नाव नोंदवता येणार आहे.

मतदानाचा हक्क कोणाला मिळतो?

कोणत्याही निवडणुकीत मतदान करायचे असल्यास संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असते. संविधानाने १८ वर्षांवरील सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तरीदेखील अनेकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नसल्याची बाब समोर आली आहे. लोकशाहीतील मतदान प्रक्रियेचा हक्क बजाविण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर मतदार यादीत नाव नोंदवून घ्यावे, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे. त्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याद्वारे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कोणत्याही व्यक्तीला घरबसल्या मतदान यादीत नाव नोंदवता येणार आहे.

मतदार यादीत नाव कसे नोंदवता येते?

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला login/register या पर्यायावर क्लिक करावे लागेल. इथे सुरुवातीला तुम्हाला ‘Register’ असा पर्याय दिसेल. पर्यायावर क्लिक करून तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून खाते तयार करावे लागेल. ही माहिती भरून झाल्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटोपी टाकून आपली पडताळणी करून घ्यावी लागेल.

मतदार यादीत नाव नोंदवण्याची प्रक्रिया

तुम्ही Voter Helpline App चा वापर करूनही मतदार यादीत आपले नाव तपासू शकता किंवा ऑनलाइन नोंदणी करू शकता. नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी फॉर्म ६ भरावा लागतो. या अर्जावर सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जतन करून ठेवायचा आहे. त्यानंतर मतदान यादीत नाव नोंदण्यासाठी फॉर्म ६ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्ही भारतातील नागरिक आहात की परदेशातील हे निवडावे लागेल. यानंतर तुम्ही कोणत्या राज्यात राहतात त्याचे नाव समाविष्ट करावे लागेल. पुढे तुम्हाला काही विधानसभा मतदारसंघांची नावे दिसतील, त्यापैकी तुम्ही राहत असलेला विधानसभा मतदासंघावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जसे की- तुमचे नाव, आडनाव, लिंग, जन्मतारीख (वय) आणि आधार क्रमांकची माहिती समाविष्ट करावी लागेल.

अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे आवश्यक

तुम्ही ज्या पत्त्यावरून अर्ज करत आहात, त्यावर तुम्ही किती वर्षांपासून राहत आहात याची माहितीदेखील भरावी लागेल. तसेच, सर्व माहिती सत्य असल्याची हमी द्यावी लागेल. वयाच्या दाखल्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, १०वी/८वी/५वीची गुणपत्रिका याची एक ऑनलाइन प्रत अपलोड करावी लागेल. तसेच रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड, बँक/पोस्ट ऑफिस पासबुक किंवा वीजबिल यापैकी एका कागदपत्राची आवश्यकता असेल. सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून तुम्ही फॉर्म अपलोड करू शकता. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला Reference ID/Application ID प्राप्त होईल. त्याचा वापर करून तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.

मतदार यादीत तुमचे नाव कसे शोधाल?

मतदारांना मतदार यादीत आपले नाव शोधता यावे यासाठी निवडणूक आयोगाने संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करावे लागेल. वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला पर्याय दिसतील. त्यातील ‘Search by Details’, ‘Search by EPIC’, आणि ‘Search by Mobile’ या पैकी एका पर्यायावर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक आणि आवश्यक माहिती तसेच कॅप्चा कोड सबमिट करावा लागेल. यानंतर ‘Search’ वर क्लिक करा. त्यानंतर सर्च बटनावर क्लिक केल्यास मतदार यादीतील तुमचे नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल. जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचे नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील पुन्हा एकदा तपासून पाहा.तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.

Leave a Comment