Kangana Ranaut and Supriya Sule Dance Rehearsal: राजकारणात पक्ष, विचारधारा बाजूला ठेवून सण-समारंभाला पुढारी एकत्र आल्याची उदाहरणे अनेकदा दिसतात. महाराष्ट्र याबाबत अधिक पुढारलेला आहे, असे म्हटले जातात. महाराष्ट्रात एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका घेणारेही समारंभ आणि दुःखद प्रसंगात एकत्र येतात.
सध्या दिल्लीतही असेच वातावरण दिसत आहे. भाजपाचे खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू आहे. या लग्नात चक्क खासदार नृत्य सादर करणार आहेत. या नृत्याची तालीम करतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र एक्सवरील युजर्सना ही राजकीय संस्कृती रुचलेली दिसत नाही.
खासदार कंगना रणौत यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमासाठी चार खासदार नृत्याची तालीम करताना दिसून येत आहेत. या फोटोत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाचे नवीन जिंदाल आणि कंगना रणौत दिसून येत आहेत.
कंगना रणौत यांनी स्टोरीच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सहकारी खासदारांबरोबर काही फिल्मी क्षण. नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त संगीत कार्यक्रमाच्या नृत्याची तलीम करताना…” वेगवेगळ्या पक्षांचे आणि एकमेकांविरोधात नेहमीच टीका करणाऱ्या पक्षाचे खासदार एकत्र नृत्य करताना दिसल्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर टीका
कंगना रणौत यांनी शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही हँडल्सवरून या फोटोवर टीका करण्यात आली आहे. डॉ. निमो यादव या हँडलवरून केलेल्या पोस्टला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. “अशाप्रकारे राजकारणी तुम्हाला मूर्ख बनवतात…”, अशा आशयाची पोस्ट या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.
कोण आहेत नवीन जिंदाल?
नवीन जिंदाल हे प्रसिद्ध उद्योगपती आणि राजकारणी आहेत. २००४ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर २००९ साली पुन्हा त्यांनी विजय मिळवला. २०१४ साली त्यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. तर २०१९ साली काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नव्हते. २०२४ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा कुरुक्षेत्र लोकसभेतून ते संसदेवर गेले.