Maharashtra Local Body Election:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. तर, काही नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकांचा निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या ऐनवेळी घेतलेल्या निर्णयाने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. आता, राज्य निवडणूक आयोगाकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज. Farmer Day Light New Rule
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमात बदल होणार असल्याची चर्चा असून महापालिका निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
निवडणूक कार्यक्रमात बदल ?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा बदलाचे संकेत दिसत आहेत. ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आरक्षण पुनर्रचनेच्या कारणास्तव लांबणीवर जाण्याची शक्यता अधिक झाली आहे.
काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० पेक्षा जास्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने ज्या ठिकाणी आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे, त्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे आरक्षण नव्याने ठरविण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र चंद्रपूर आणि नागपूर महापालिकांच्या निवडणुकांना न्यायालयाने कोणताही आक्षेप नोंदवला नाही. या दोनच महापालिकांचे आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाले आहे.
महापालिका निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार ?
दरम्यान, या निवडणुकांपूर्वी महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. येत्या गुरुवारी (ता. ४) राज्यातील २९ महापालिकांच्या आयुक्तांसोबत निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक होणार आहे.
व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे होणाऱ्या या बैठकीत महापालिकांची निवडणूक तयारी, मतदार यादीची स्थिती आणि तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. आयोगातील सूत्रांच्या माहितीनुसार, १५ ते २० डिसेंबरदरम्यान महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.
मतदार याद्यांवरील शेवटचा टप्पा
महापालिकांच्या मतदार याद्या तयार झाल्या असून १० डिसेंबर रोजी त्यांना अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. अंतिम याद्यांवर आक्षेप नोंदविण्यात आल्यास त्यावरील सुधारणा प्रक्रियेमुळे निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसांचा विलंब संभवतो.
गुरुवारी होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.